ad headr

Powered by Blogger.

प्रताप महाविद्यालयात कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन संपन्न.


अमळनेर : दि. 16 [प्रतिनिधी] किरण लोखंडे येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मराठी विभागात दुपारी तीन ते चार या वेळेत मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मरण दिनाचे औचित्य साधून 'स्मरण ढसाळांचे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने कवी नामदेव ढसाळ यांच्या प्रत्येकी दोन कवितांचे अभिवाचन विभागातील प्राध्यापकांनी केले. 
अभिवाचनाची सुरुवात विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या प्रस्ताविकाने झाली. त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचे सामाजिक, राजकीय व वैचारिक महत्त्व स्पष्ट केले. यानंतर त्यांनी ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ या काव्यसंग्रहातील ‘फसफसणारी माणसं’ तसेच ‘गोलपिठा’ मधील ‘अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा’ या कवितांचे वाचन केले.
यानंतर प्रा. डॉ. रमेश माने यांनी ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ आणि ‘बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात’ या कवितांचे सादरीकरण केले. प्रा. योगेश पाटील यांनी ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातील ‘दर्ग्याच्या वाटेवर’ आणि ‘समतेचे बुरुज’ या कवितांचे वाचन केले.
प्रा. डॉ. विलास गावित यांनी ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या काव्यसंग्रहातील ‘निमित्त: ६ डिसेंबर’ तसेच ‘गोलपिठा’ मधील ‘रस्त्याच्या कडे कडेने’ या कवितांचे वाचन केले. त्यानंतर प्रा. गोपाल बडगुजर यांनी ‘गांडू बगीचा’ या काव्यसंग्रहातील ‘मायाबाजार’ आणि ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातील ‘इतिहास भूगोल’ या कवितांचे वाचन केले.
प्रा. सागर सैंदाणे यांनी ‘तुही यत्ता कंची? तुही यत्ता’ या काव्यसंग्रहातील ‘भर’ तसेच ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील ‘कुठल्या दिशेने घोडा हाकू’ या कवितेचे वाचन केले. त्यानंतर डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी यांनी ‘गांडू बगीचा’ या काव्यसंग्रहातील ‘घोडे’ आणि ‘कविता’ या शीर्षकांच्या कवितांचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. त्यांनी ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातील ‘माण्साने’ ही कविता सादर केली आणि कार्यक्रमाचा समारोप ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातील ‘आमच्या आळीतून जाताना’ या कवितेच्या वाचनाने केला.
या काव्यवाचन कार्यक्रमातून नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही काव्याची सामाजिक जाणीव, वास्तवदर्शी दृष्टिकोन आणि मानवी मूल्ये प्रभावीपणे अधोरेखित झाली. या कार्यक्रमास मराठी विभागातील विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

No comments