आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव आयोजित पाच दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद
जळगाव दि. 16 [ प्रतिनिधी ] महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या ध्येयाने आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेला जळगाव शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेमध्ये तब्बल १,००० हून अधिक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेमध्ये महिलांना सुगंधित मेणबत्ती निर्मिती, फिनाइल तयार करणे, डिश वॉश बनवणे, सुगंधित पान मुखवास तयार करणे, पावभाजी मसाला व विविध मसाल्यांचे उत्पादन तसेच कापडी रांगोळी तयार करणे अशा कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या स्वयंरोजगाराचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेस प्रोत्साहनपर गिफ्ट देण्यात आले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात आले. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच भविष्यात स्वयंरोजगार सुरू करताना अधिकृत ओळख मिळण्यास मोठी मदत होणार आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अर्चना संजय पाटील, अध्यक्षा – आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांनी आपल्या मनोगतात “महिला आत्मनिर्भर झाल्याशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. प्रत्येक महिलेकडे स्वतःचा उद्योग, स्वतःची ओळख आणि स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असावे, हेच माझे स्वप्न आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार कसा उभा करायचा, याची प्रत्यक्ष दिशा आम्ही दाखवून दिली आहे,” असे नमूद केले.
या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश दामू भोळे (राजू मामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक भाऊ सूर्यवंशी, मा नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे
व श्रीमती केतकीताई पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. मान्यवरांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळून कुटुंब व समाज बळकट होतो, असे मत व्यक्त केले.
Post a Comment