ad headr

Powered by Blogger.

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद ३० जानेवारीपर्यंत शेतीतील प्रयोग पाहता येणार

जळगाव दि.१३ (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हा महोत्सव १४ जानेवारीऐवजी आता ३० जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. १२ डिसेंबरपासून आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधून सुमारे ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. जैन हिल्सवरील हा कृषी महोत्सव म्हणजे केवळ प्रदर्शन नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीत वापरता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी आहे. 
शेतकरी येथे येऊन नव्या शेती पद्धती, सुधारित वाण, सूक्ष्म सिंचन व्यवस्था आणि प्रिसिजन शेतीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहत आहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन परत जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कांदा, केळी हे पीक आहेत. प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या सुधारित व्हरायटी, टोमॅटो लागवड, तसेच करार शेतीच्या माध्यमातून हमी भावाने कांदा व टोमॅटो खरेदीची व्यवस्था कशी उभी केली जाते, याचे सविस्तर मार्गदर्शन येथे मिळत आहे. यासोबतच डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, पपई आदी फळपिकांच्या लागवड पद्धतींमध्ये झालेल्या बदलांची माहिती देण्यात येत आहे. अतिसघन लागवड पद्धतीमुळे कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळू शकते, याची प्रत्यक्ष उदाहरणे शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आली आहेत. 

सूक्ष्म सिंचन क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचनासह जैन ऑटोमेशन प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली कशी उपयुक्त ठरते, सिंचन व फर्टिगेशनद्वारे खतांचे अचूक नियंत्रण कसे साधता येते आणि मजुरीवरील अतिरिक्त खर्च कसा कमी होतो, याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळत आहे. जैन हिल्सवरील कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम आहे. प्रत्यक्ष उभ्या पिकांवर केलेले प्रयोग, शास्त्रोक्त पद्धतींची प्रात्यक्षिके आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. यावर्षी ‘सायन्स-टेक@वर्क’ ही संकल्पना घेऊन हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी जैन हिल्स येथे येऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन इरिगेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments