डॉ. नितू पाटील यांनी वर्षभरात १४१० रुग्णांना दिली नवी दृष्टी.
जळगाव - प्रतिनिधी..डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागात कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांनी आपल्या सेवाभाव, कौशल्य आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे रुग्णांचा अपार विश्वास संपादन केला आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी तब्बल १४१० रुग्णांवर यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी दिली आहे.
डॉ. नितू पाटील हे पहाटे सकाळी ५ वाजता नेत्रशस्त्रक्रिया सुरू करणारे एकमेव नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वेळेचे काटेकोर पालन, रुग्णांप्रती संवेदनशील दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांची ओळख आहे. प्रत्येक रुग्णासोबत ते केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर कौटुंबिक बांधिलकी जपत उपचार करतात, ही बाब रुग्णांसाठी विशेष दिलासादायक ठरते.
डॉ. नितू पाटील यांनी आतापर्यंत ३२,५३१ पेक्षा अधिक नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा विक्रम केला असून, त्यांच्या या कार्यामुळे राज्यासह विदर्भ, खान्देश व मराठवाड्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णांचा विश्वास सार्थ ठरणारे उपचार, अचूक निदान आणि शस्त्रक्रियेनंतरची योग्य काळजी यामुळे त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे.
या उल्लेखनीय कार्यामागे डॉ. उल्हास पाटील हेच आपले प्रेरणास्थान आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हा मंत्र घेऊन कार्यरत असलेल्या डॉ. नितू पाटील यांचे योगदान नेत्ररोग क्षेत्रात मोलाचे ठरत असून, हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे आहे.
- डॉ. नितू पाटील, नेत्रतज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.
Post a Comment