ad headr

Powered by Blogger.

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरोत्सवाची सांगता रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव 2027 मध्ये.

  जळगाव दि. ११ (प्रतिनिधी)  -  बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी प्रथम सत्रात विदुषी यशस्वी सरपोद्दार यांच्या गायनाने आणि श्रेया देवनाथ व्हायोलीन वादन तर जी.जीवा हे ताविल वादनाने समारोप झाला. पुढील वर्षी २०२७ मध्ये रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव होणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दीपक चांदोरकर यांनी सांगितले
छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या २४ व्या अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे औपचारिक उद्घाटन यशस्वी सरपोद्दार, योगिनी बाक्रे, मेजर नाना वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अविनाश नाईक यांच्या हस्ते झाले. जुईली कलभंडे हिने गुरुवंदना सादर केली.
बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी प्रथम सत्रात विदुषी यशस्वी सरपोद्दार यांनी गायन सादर केले. त्यांनी कमोद रागातील बडा ख्याल “हू जनमना छंद” (विलंबित एकताल) सादर करत मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर द्रुत एकतालातील “जाने ना दुंगी छंद दे” ही बंदिश सादर झाली. डॉ. प्रभा अत्रे यांनी गायन केलेली अजरामर कलावती रागातील रचना “फलकन लागो” ही आणि अध्या तीन तालातील प्रसिद्ध बंदिश “तन मन धन टोपे लागू” सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. “याद पिया की आये” ही ठुमरी आणि “आन बान हा” ही मिश्रा दादरा यामुळे मैफिलीची रंगत वाढली. “नारायणा रमा रमणा” हे नाट्यपद आणि “पतित तू पावना म्हणविसी नारायणा” या अभंगाने मैफिलीची सांगता झाली. तबल्यावर तेजोवृष जोशी तर संवादिनीवर अभिनय रवंदे यांनी साथसंगत केली.

No comments