युरिया नव्हे ते खत पोटॅशच!तपासणीतून सिद्ध : रावेर तालुक्यातील शेतकऱ्याचा दावा तथ्यहीन.
जळगाव : दि. 9 प्रतिनिधी.आयपीएल कंपनीच्या खताविरूद्ध रावेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केलेला दावा खोटा असल्याचे नमुने तपासणीअंती सिद्ध झाले आहे. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या आयपीएलच्या खतात युरिया नसून शंभर टक्के पोटॅश असल्याचे आढळले. जिल्हा परिषद कृषि विभागासह कंपनी प्रशासनाने याबाबत निर्वाळा करून शेतकऱ्यांनी खोट्या प्रसाराला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
रावेर तालुक्यातील शेख चांद शेख मेहमूद यांनी आयपीएल कंपनी पोटॅशच्या नावाने युरिया देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा दावा एका व्हीडीओतून समाज माध्यमावरून केला होता. तसेच कृषी विभागाकडे लेखी तक्रारही केली होती. जिल्हा परिषद कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी त्याच दिवशी भरारी पथकासह रावेर तालुक्यातील संबंधित विक्रेत्याचे दुकान गाठत विविध चार सॅम्पल घेऊन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले.
प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यात युरिया नसल्याचे समोर आले. त्यात प्रमाणकानुसार पोटॅश असल्याचे आढळले. त्यामुळे शेतकऱ्याने केलेला दावा हा निराधार ठरला. मापदाचे रावेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडून कृषी निविष्ठा खरेदी करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी आयपीएलच्या पोटॅशबाबत समाज माध्यमावर निर्माण केल्या जाणाऱ्या फेक नॅरेटिव्हवर विश्वास ठेऊ नये.
आयपीएल ही शासनमान्य सर्टीफाईड कंपनी आहे. त्यांच्या पोटॅशबाबत तक्रारीची तात्काळ दखल घेत प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यात युरिया नसून ते पोटॅशच असल्याचे चार विविध नमुन्यांच्या तपासणी अहवालातून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, रसायने, किटनाशकांबाबत काही शंका असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. आम्ही शंकाचे निरसन करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यास कटिबद्ध आहोत.
-पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जि.प., जळगाव
आयपीएल देशभरात ७१ टक्के पोटॅशचा पुरवठा करते. हा पोटॅश लाल किंवा पांढऱ्या रंगात इतर देशातील खाणींतून भारतात येतो. प्रक्रिया करताना गोल दाणे तयार होत असतात त्यातून संभ्रम झाला असावा. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार कृषी विभागाने केलेल्या तपासणीत हे खत युरिया नसून पोटॅशच असल्याचे सिद्ध झाले. शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल पोस्टवर विश्वास ठेऊ नये. आमचे उत्पादन प्रमाणित व प्रामाणिक आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करून ते निसंकोच वापरावे.
- वैभव मोहोळ, जिल्हा प्रतिनिधी, आयपीएल
Post a Comment