भडगाव शहरातील 'रामभरोसे' सुरक्षा व्यवस्थेला नवसंजीवनी! सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे काम सुरू; नागरिक-संस्थांना मदतीसाठी पोलिसांचे आवाहन
भडगाव:-दि. 14.[ प्रतिनिधी ]सुभाष ठाकरे. शहरात लाखो रुपये खर्चून बसवलेली आणि गेल्या ६-७ महिन्यांपासून ठप्प झालेली सीसीटीव्ही व्यवस्था अखेर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शहरात बसवण्यात आलेल्या ४२ कॅमेऱ्यांपैकी केवळ एकच कॅमेरा कार्यरत असल्याने वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. 'दैनिक पुण्यनगरी'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करत लक्ष वेधले होते, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद पडलेल्या सर्व कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
लाखो रुपये खर्चूनही सुरक्षा ठप्प
शहरातील कायदा-सुव्यवस्था, महिला-विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषद स्थानिक निधीतून १५ ते १६ लाख रुपये आणि खासदार निधीतून १० लाख रुपये, असा एकूण २५ ते २६ लाखांचा खर्च करून मुख्य चौकांमध्ये ४२ आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी गेल्या ६-७ महिन्यांपासून हे सर्व कॅमेरे बंद पडले होते आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अकार्यक्षम झाली होती. यामुळे रात्रीच्या वेळेस चोरी, रोकड लंपास होणे तसेच महिलांच्या मौल्यवान वस्तू चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.
कॅमेरे बंद असल्याने अवैध धंदे आणि वाळू वाहतुकीला संरक्षण मिळत असल्याचा संशयही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला होता.
नागरिकांच्या मागणीची आणि 'दैनिक पुण्यनगरी'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. कॅमेरे पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे पोलीस यंत्रणेला कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल नागरिकांनी दै.मानवहीत व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नवीन कॅमेऱ्यांसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन
सीसीटीव्ही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने '१ कॅमेरा पोलिसांसाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी' या नवीन संकल्पनेतून शहरात आणखी १० ते १५ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे.
भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी शहरातील नागरिकांना, समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना आणि दानशूर व्यक्तींना या सुरक्षा उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आर्थिक मदतीचा हात देण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
"शहरातील ४२ पैकी बंद असलेले सर्व कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. याशिवाय '१ कॅमेरा पोलिसांसाठी अन जनतेच्या सुरक्षेसाठी' या संकल्पनेतून १० ते १५ नवीन कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी याकामी सहकार्य करावे."
महेश शर्मा
पोलीस निरीक्षक
Post a Comment