डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेत आकर्षक चित्रफलक साकार.
जळगाव दि.13 [ प्रतिनिधी] वर्डी येथील स्वा.सै.श्री.शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत करण्याच्या उद्देशाने कलाशिक्षक भूषण सानप सर यांनी एक सुंदर व आकर्षक चित्रफलक साकारला आहे.
या चित्रफलकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत देखणे व्यक्तिचित्र रेखाटण्यात आले असून त्यासोबतच ज्ञानाचे प्रतीक असलेली लेखणी दर्शवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्या लेखणीमध्ये दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करणारा विद्यार्थी दाखवून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच फलकावर डॉ. आंबेडकर यांची सहीही रेखाटण्यात आल्यामुळे फलक अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल जाणीव निर्माण होऊन “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात यश आले आहे.
या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक मोहन चव्हाण व पर्यवेक्षक आर. बी. साळुंखे यांनी कौतुक केले असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
सदर चित्रफलकामुळे संपूर्ण शाळेत प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Post a Comment