बदलविण्यापेक्षा स्वत:ला बदला.. ‘आनंदम्’ मंत्र जपा... प.पू. ललितप्रभजी म. सा.
जळगाव दि. ५ प्रतिनिधी - दुसऱ्यांमधील चुका शोधून त्यांच्यात बदलविण्यासाठी आपण व्यर्थ प्रयत्न करत असतो. त्यापेक्षा आपण स्वत:चे आचरण बदलविले तर आनंदी जीवन जगता येते. आपल्यापेक्षा दुसऱ्या कसा सुखी ही संकुचित भावना न ठेवता, परोपकारी, धैर्यशील सकारात्मकता ठेवली पाहिजे. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल ‘आनंदम्’ मंत्र जपला पाहिजे. ‘जसी दृष्टी तशी दिसेल सृष्टी’ या नियमांप्रमाणे सर्वांनी आपले व्यावहारीक आचारण केले पाहिजे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन राष्ट्रसंत प.पू. ललित प्रभजी म.सा. यांनी केले.
श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या श्रम सिंचनाने साकार झालेल्या जैन हिल्सवर आनंदमयी विहार करताना ‘संस्कार, समर्पित कर्म, सृजनात्मक विचारांची यशस्वीता’ या विषयावर श्रावक-श्राविकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत प.पू. डॉ. शांतीप्रिय सागरजी म. सा. होते.
जळगाव शहरातून आनंद विहार करीत जैन हिल्स येथे प.पू. संतद्वयांचे सकाळी पावणे सात वाजता आगमन झाले. जैन परिवाराच्या वतीने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, अनिल व निशा जैन, अजित व शोभना जैन तसेच परिवारातील सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. ‘श्रद्धा ज्योत’ व ‘श्रद्धा धाम’ असा विहार करीत ते जैन हिल्स येथील आश्रम प्रांगणात पोहोचले.
निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जैन हिल्सवर होत असलेले हे कार्य अत्यंत अनमोल आहे. हे तर धरतीचे स्वर्गच आहे. असे शुभ आशीर्वाद प. पू. ललितप्रभजी म.सा. यांनी यावेळी दिले. ‘संतती ही तीन प्रकारची असते, वडिलांची संपत्ती गमावणारी, वडिलांची संपत्ती उपभोगणारी आणि वडिलांच्या संपत्तीत मोलाची भर घालणारी. जैन परिवारातील हे चौघे सुपुत्र आपापल्या पद्धतीने वडिलांचे संस्कार जपत, त्यांनी उभ्या केलेल्या कृषी क्षेत्रातील महान कार्याला पुढे नेत आहेत, त्याचे कार्य वाढवित आहेत.’ याचा विशेष आनंदही प.पू. ललित प्रभजी म.सा यांनी व्यक्त केला.
आकाश ग्राऊंडवर भवरलालजी आणि कांताबाई जैन परिवारातर्फे झालेल्या प्रभावी प्रवचनाची सुरवात प. पू. डॉ. शांतीप्रिय सागरजी म.सा. यांनी ‘जीवन में कुछ करना है, तो हिम्मत ना हारे..’ या प्रेरणागिताने केली. पृथ्वीवरील स्वर्ग हा जैन हिल्स वर अवतरला असून लंडन, अमेरिकेपेक्षाही सुंदर ठिकाण म्हणजे जैन हिल्स आहे. याठिकाणी प्रकृतीच्या पृथ्वी, आकाश, हवा, अग्नी, पाणी यांच्या संगमातून पुढे चालत राहण्याचा संस्कार मिळतो, ‘सडक से शिखर’ पर्यंत प्रवास करायचा असेल तर ‘कर्म हेच जीवन’ हे मानून परिश्रम करत राहिले पाहिजे असे मोलाचे विचार त्यांनी व्यक्त केले.
प.पू. ललित प्रभजी म.सा. यांनी कर्मयोग आणि कर्मयोगी हा प्रवास उलगडून दाखविला. जे आपल्या भाग्यात आहे ते कधीही कुणीही घेऊन जात नाही. त्यासाठी जे काम आपल्या वाट्याला आले आहे ते प्रसन्नपूर्वक केले तर यश नक्कीच मिळते. कार्याला भार न मानता सौभाग्य मानले पाहिजे. ध्येय मोठी असली पाहिजे. सकारात्मक भावनेतून ती पूर्ण केली पाहिजे. निराशा आली तरी आशा ठेवली पाहिजे. जे माझे आहे ते कुठेही जाणार नाही ही भावना ठेऊन जे माझे नाही त्यासाठी रडत बसू नये. जीवनात समस्या येतात त्याला कसे सामोरे जातो यावर आपले पुढील आयुष्य अवलंबून असते. एखाद्या ‘तस्वीर’ मध्ये आपल्या सोबत कोण आहे त्यापेक्षा ‘तकलीफ’ मध्ये कोण सोबत आहे हे महत्त्वाचे आहे. सुखी होण्याची प्रत्येकाची ईच्छा असते मात्र दुसऱ्यांचे सुख आपल्याकडून पाहवत नाही. माफ करणे शिका, शब्द जपून वापरा, कुणाचे मन दुखेल असा व्यवहार करु नका, साधेपणातूनच वैभव मिळते. दुसऱ्यांशी तुलना करु नका, प्रतिकूल परिस्थितीही मनस्थिती बिघडू देऊ नये. क्रोध निर्माण करणारी भाषा वापरण्यापेक्षा समझदारीची भाषा व्यवहारात आणली पाहिजे. स्व: सुख पेक्षा सर्वांच्या सुखासाठी प्रयत्न करावे. सुंदर चेहरा काही क्षणांसाठी लक्षात राहतो, मात्र सुंदर चरित्र हे कायम स्मरणात राहते. मनुष्याने चेहऱ्याला सजविण्यापेक्षा चरित्राला प्राधान्य दिले पाहिजे. हेच परमेश्वराला अपेक्षित असते. आपल्या सोबतीला कुठल्या विचारांचे लोक आहेत यावर आपल्या जीवनाची दिशा ठरते त्यामुळे नकारात्मक लोकांपासून दूर रहा, स्वत:प्रति सकारात्मक रहा हेच आपल्यासाठी ‘धन’ आहे. जे काम आपण करतो ते सर्वश्रेष्ठ करा, यातून जे परिणाम समोर येथील त्याचेही विवेकपूर्ण स्वागत करा. पैसा, पद, सम्मान पेक्षा कर्मयोगाच्या प्रतिभेतून मिळालेली सेवा महत्त्वाची आहे हा सेवाभाव भवरलाल जैन यांच्या आचरणातून जैन-चोरिडाया परिवारावर संस्कारीत झाल्याचेही प.पू. ललित प्रभजी म.सा. म्हणाले.
अनिल कोठारी यांनी सूत्रसंचलन केले. नितीन चोपडा यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत अशोक जैन यांनी केले. आभार अनिल जैन व निशा जैन यांनी मानले. संघपती दलिचंद जैन यांनी परिवाराच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी नयनतारा बाफना, ताराबाई डाकलिया, अजय ललवाणी, दिलीप गांधी, ललित लोडाया, डी. एम. जैन, विजय जैन, सुरेश जैन, डॉ. सतिश जैन, देवांग दोशी यांच्यासह जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकारी तसेच शहरातील श्रावक-श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post a Comment