७५ वर्षीय महिलेचे निकामी पाय शस्त्रक्रियेमुळे पूर्ववत.पाठीतील मणक्याच्या फ्रॅक्चरमुळे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका शल्यचिकीत्सकांचे यश.
जळगाव : जळगाव दि 5 [प्रतिनिधी]. पाय घसरून पडल्याने पाठीच्या मणक्याला गंभीर इजा होऊन चालण्यास असमर्थ झालेल्या ७५ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पूर्ववत झाले आहेत. मेंदू व मणका शल्यचिकीत्सकांच्या कुशल पथकाने सुमारे तीन तास चाललेल्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाला नवे जीवनदान दिले.
याबाबत माहिती अशी की, सुनंदाबाई जगतराव भदाणे (रा. बिलखेडे, ता. धरणगाव) या ७५ वर्षीय महिला पाय घसरून खाली पडल्या. या अपघातानंतर महिलेला पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना जाणवू लागल्या. काही वेळातच दोन्ही पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा येणे आणि चालता न येणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली. वाढत्या त्रासामुळे कुटुंबीयांनी तातडीने तिला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी महिला रूग्णाची सखोल तपासणी करण्यात आली. एमआरआय तपासणीत पाठीच्या मणक्याच्या डी ११, डी १२ आणि एल १ या भागात फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. या फ्रॅक्चरमुळे मज्जासंस्थेवर दाब येत असून त्याचा परिणाम म्हणून दोन्ही पायांची ताकद लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांच्या तज्ज्ञ पथकाने सुमारे तीन तास चाललेली डी ११ अॅन्ड एल १ पेडीकल स्क्रु फिक्सेशन विथ डी १२ लॅमीनोटोमी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. अतुल जाधव, निवासी डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. व्ही. सतीश यांनी सहकार्य केले.
शस्त्रक्रियेमुळे पायाची ताकद परतली
शस्त्रक्रियेदरम्यान फ्रॅक्चर झालेल्या मणक्यांना स्क्रूच्या साहाय्याने स्थिर करण्यात आले तसेच मज्जासंस्थेवरील दाब कमी करण्यात आला.शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाच्या पायातील मुंग्या येणे कमी झाले आणि हळूहळू दोन्ही पायांची ताकद परत येऊ लागली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या उपचार व पुनर्वसनामुळे रुग्णाला पुन्हा चालता येऊ लागले. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली.
कोट...
मणक्याच्या फ्रॅक्चरकडे दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. वेळेत योग्य तपासणी व शस्त्रक्रिया केल्यास अशा रुग्णांना पुन्हा सामान्य जीवन मिळू शकते. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा व अनुभवी तज्ज्ञांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
- डॉ. अतुल जाधव, मेंदू व मणका विकार तज्ज्ञ.
Post a Comment