नशेत धुंद स्वयम घोषित पत्रकाराचा पोलीस स्टेशनमध्ये 'धिंगाणा': " पोलिसांवर हात उगारला; गुन्हा दाखल, अटकेची कारवाई
भडगाव: स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या विठ्ठल नामदेव मराठे (वय-५५, रा. वरची पेठ, भडगाव) या व्यक्तीने दारूच्या नशेत पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तल्लीन झालेल्या विठ्ठल मराठे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात "तुम्हाला जेवढा पगार आहे, तेवढे माझ्याकडे वाळूचे डंपर आहेत.
मी एकदा मंडप लावून उपोषणाला बसलो, तर तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकेल, माझ्या नादाला लागू नका," अशी धमकी दिली.
स.फौ. अनिल रामचंद्र अहीरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विठ्ठल मराठे पोलीस स्टेशनच्या अंमलदार/बारनिशी कक्षात दारूच्या नशेत आला आणि त्याने फिर्यादीस तुम्ही पनाका दाखल केली, ३०७ चा गुन्हा का दाखल केला नाही, असे विचारत मोठमोठ्याने आरडाओरड करून अश्लील शिवीगाळ केली. "मी जर मंडप लावून उपोषणाला बसलो तर तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकेल, तुमच्या जेवढा पगार आहे तेवढे माझे डंपर चालतात." शासकीय गणवेशात कर्तव्यावर असलेल्या फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन त्याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्यांच्या छातीवर बुक्क्याने मारले. यामुळे गणवेशावरील सर्व्हीस बॅच तुटून नुकसान झाले. तसेच, त्याने पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षातील बारनिशीचे जुने कॉम्प्युटरचे सी.पी.यू. जमिनीवर आपटून नुकसान केले. म्हणून स.फौ. अनिल रामचंद्र अहीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल मराठे याच्याविरुद्ध भा.दं.सं. २०२३ प्रमाणे गु.र.न. ४८५/२०२५ अन्वये, कलम १३२, १२१(१), २९६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम १९४९ चे कलम ८५ (१), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११०, ११२, ११७ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहेत. सदर आरोपीला भडगाव न्यायालय सुट्टीवर असल्याने पाचोरा न्यायालयात हजर केले असता पाचोरा न्यायालयाने आरोपी विठ्ठल मराठे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव सबजेल मध्ये कैद्यांना जागा नसल्याने त्याची नंदुरबार सबजेल येथे रवानगी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Post a Comment