ad headr

Powered by Blogger.

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण..

जळगाव, दि.१२. : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे.
रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे संचालन केले जाते. या केंद्रातील मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्यासमवेत दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका हर्षाली चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई तसेच बरुन मित्रा उपस्थित होते.
प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाउंडेशनचे शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. अश्विन झाला यांनी केले. ज्योती जैन यांचे स्वागत गायत्री भालेराव, दीपाली सुरळकर यांनी त्यांच्या हस्तनिर्मित पुष्पगुच्छाने केले. हर्षाली चौधरी यांचे स्वागत अनिता यादव यांनी केले. तर अब्दुल भाई यांचे स्वागत समीर कोल्हे, कुणाल कोल्हे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी दिव्यांग मुलांना चरखा चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संचालिका हर्षाली चौधरी यांनी सांगितले की, "आमची मुले लवकरच सूत कताईत प्राविण्य मिळवतील, याची मला खात्री आहे.” गांधी विचार संस्कार परिक्षेचे गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून डोके-हृदय-हात यामधील समन्वय वाढेल. या उपक्रमातून रोजगार निर्मिती होऊन मुले स्वावलंबी होतील. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील, दीपक मिश्रा, अजय क्षीरसागर, मयूर गिरासे, अनिलेश जगदाळे, सागर टेकावडे, भूषण अस्वार, सागर पाटील, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


No comments