मृत्यूकार विनोद अहिरे यांचं सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडून कौतुक
काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्री नवीन कुमार हे न्यायालयीन कामानिमित्त जळगाव जिल्हा न्यायालयात आले होते. त्यांनी न्यायालयातील गेट क्रमांक दोनवर असलेल्या चौकीवर कार्यरत असलेले विनोद अहिरे यांना विचारणा केली असता मी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करतो माझं इकडील न्यायालयात काम आहे, सदरचं काम सोयीचं होण्यासाठी येथील स्थानिक वकील आपल्या परिचयाचे असतील तर त्यांचा मोबाईल क्रमांक मिळेल काय? या चर्चेदरम्यान चौकीत एका कोपऱ्यात पडलेल्या पुस्तकाकडे त्यांचं लक्ष गेलं. ते पुस्तक होतं 'मृत्यू घराचा पहारा' त्यांनी सहज चाळून पाहिलं. त्यानंतर मुखपृष्ठावरील निरीक्षण केलं असता, त्यावर कोरोना कक्षा समोर फेस गार्ड, मेडिकल कॅप घालून पोलीस गणवेशात पहारा करणाऱ्या पोलिसांचं चित्र आणि लेखक म्हणून पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे हे नाव त्यांनी पाहिलं आणि समोर उभे असलेले विनोद अहिरे यांच्या नेम प्लेटवरील नाव बघून त्यांनी अहिऱ्यांना विचारले की, 'बूक के ऑथर आपही हो क्या'? अहिरे यांनी हो सांगितल्यावर कुमार यांनी सकारात्मक आश्चर्य व्यक्त करून त्यातील पाचव्या क्रमांकाचे 'मृत्यू घराचा पहारा करताना' हे संपूर्ण प्रकरण वाचून काढलं. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या आणि अहिरे यांना म्हणाले की, सर्व जग थांबलेलं असताना, पोलिसांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणतंही प्रशिक्षण नसतांना, तरी देखील अत्यंत निर्भीडपणे वैद्यकीय क्षेत्राच्या खांद्याला खांदा लावून पोलीस काम करत होते. पोलिसांनी कोणत्या वेदना काळजात घेऊन काम केलं, हे आपल्या 'मृत्यू घराचा पहारा' या पुस्तकाचे वाचन करताना डोळ्यासमोर येते. त्यानंतर अहिरे यांची अधिक माहिती जाणून घेतली असता, प्रभावित होऊन त्यांनी आश्वासन दिले की आपलं कार्य मी मा. पंतप्रधान यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीला कधीही येणं झालं तर नक्की आवर्जून माझी भेट घ्या असं भेटीचं आमंत्रण देऊन ते निघून गेले. विनोद अहिरे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाट्यामध्ये सलग सात महिने कोरोना संसर्गजन्य कक्ष येथे गार्ड ड्युटीच कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्या अनुभवाचं त्यांनी 'मृत्यू घराचा पहारा' हे पुस्तक आणि 'हुकार वेदनेचा' हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री कोविड सहायता निधीसाठी त्यांचा संपूर्ण एक महिन्याचा वेतनही दिलेलं आहे. विनोद अहिरे यांच्या कर्तुत्वाला आमच्याकडून देखील सलाम.
Post a Comment