मध्यप्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी-आ. अमोल जावळे
रावेर– प्रतिनिधी | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व वादळी वार्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळावी यासाठी रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत ठोस आवाज उठवला आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर अवघ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी नुकसानभरपाई जमा केली जाते, मात्र महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते, ही बाब त्यांनी अधिवेशनात ठळकपणे मांडली.

रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये मागील महिन्यात वादळी वार्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. मात्र अनेक गावांमध्ये अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. “चिनावल, उटखेडा, रसलपूर या भागांत २९ जून रोजी झालेल्या नुकसानीच्या जिओ टॅगिंग व व्हेरिफिकेशनची प्रक्रियाही रखडली आहे,” याकडेही आमदार जावळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांना पुढील पेरणीचे नियोजन करायचे असून पंचनामे लांबणीवर पडल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “शेतकऱ्यांना वेळेवर नुकसानभरपाई मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करून मध्यप्रदेशप्रमाणेच पंधरा दिवसांत नुकसानभरपाई खात्यात जमा करावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
शासनाने घेतली दखल तरच शेतकऱ्यांना दिलासा
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवे संकट भोगावे लागत आहे. यातच नुकसानभरपाईच्या प्रक्रियेला लागणारा विलंब हा शेतकऱ्यांसाठी जखमेवर मीठ चोळणारा ठरतो आहे. त्यामुळे नुकसान नोंदणी व भरपाईची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्याचे ठोस पाऊल शासनाने उचलावे, असेही आमदार अमोल जावळे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment