भडगावात जमीन वादातून भीषण हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी हल्ला,
भडगाव दि. 22 [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे. शहरातील पाचोरा रोड परिसरात जमीन व कंपाऊंड भिंतीच्या बांधकामाच्या वादातून मोठी हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सावतामाळी स्वामिलचे मालक राहुल भानुदास महाजन आणि त्यांचे शेजारी महाजन स्वामील चे भूषण पंडित महाजन यांच्यात त्यांच्या मालमत्तेच्या सीमेवर असलेल्या कंपाऊंड भिंतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला. संबंधित बांधकाम हे आपल्या मालकीच्या जागेत होत असल्याचा दावा करत राहुल महाजन यांनी काम थांबवण्याची तसेच जागेचे मोजमाप करून घेण्याची सूचना भूषण महाजन यांना केली होती.
मात्र, या सूचनेचा राग मनात धरून भूषण महाजन यांनी “ही जागा माझीच आहे, मी बांधकाम करणारच, मध्ये येणाऱ्याला सोडणार नाही,” अशी धमकी देत वाद उग्र केला. त्यानंतर त्यांनी पोहरे (ता. चाळीसगाव) येथील सरपंच काकासाहेब भीमराव माळी, गोरख भीमराव माळी व इतर ८ ते १० जणांना घटनास्थळी बोलावून वाद घातला आहे.
या सर्वांनी मिळून लाकडी दांडके, लाठ्या, लोखंडी सळया आदी हत्यारांसह राहुल महाजन यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत राहुल महाजन जखमी झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही धमक्या देण्यात आल्या. आरोपींनी घराकडे धावत जाऊन आई, बहीण, नातेवाईक तसेच कामगारांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे राहुल महाजन यांच्या कुटुंबात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच परिसरातील नागरिकांमध्येही दहशत पसरली होती. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भूषण महाजन व पोहरे येथील काही जनावर त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १३१, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींवर सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी राहुल महाजन यांनी केली आहे.
Post a Comment