अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला २३ वर्षीय तरुणाची 'कट्ट्याने' स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.
भडगाव:-[प्रतिनिधी] सुभाष ठाकरे येथील खुशाल आप्पा नगर भागात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात स्वतःवर खाजगी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. स्वप्नील प्रवीण शिपी असे मृत तरुणाचे नाव असून, ऐन अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण भडगाव शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा दुपारी आपल्या घरातील खोलीचा दरवाजा आतून बंद करून झोपला होता. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास त्याच्या आईने त्याला उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मोबाईलवर कॉल करूनही स्वप्नीलने फोन न उचलल्याने आईला संशय आला.
अखेर खिडकीतून डोकावून पाहिले असता, स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
कुटुंबियांनी इतरांच्या मदतीने तात्काळ दरवाजा तोडून स्वप्नीलला बाहेर काढले आणि तातडीने जवळच असलेल्या 'अंजली हॉस्पिटल'मध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळवले आणि पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, दुर्दैवाने या घटनेत स्वप्नीलचा मृत्यू झाला.
पोलिस प्रशासनाची धाव आणि
फॉरेन्सिक तपासणी
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप पाटील, निलेश ब्राह्मणकर, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत आणि राजेंद्र पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांनीही
भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपासात अचूकता यावी यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. तपास कामी खाजगी कट्टा, मयताचा मोबाईल, रक्ताचे नमुने सह अन्य गोष्टी ताब्यात घेण्यात आले आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरित; शहरात उलटसुलट चर्चा
स्वप्नीलने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वप्नीलकडे खाजगी कट्टा (पिस्तूल) कोठून आला? यामागे काही वैयक्तिक घटनेतुन कीवा वैयक्तिक नैराश्य? शहरात बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी सुरू आहे का?
खान्देशात अक्षय तृतीया हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सणाच्या पूर्वसंध्येलाच अशा प्रकारे तरुण मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने शिपी कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे
Post a Comment