ad headr

Powered by Blogger.

अवैध वाळूचा ट्रॅक्टर जप्त करण्याचा प्रयत्न; मंडळ अधिकाऱ्याला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल


​ भडगाव:-दि. 20 [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.  गिरड मंडळाचे अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येडे आणि त्यांचे पथक पिंपरखेड गावाजवळ अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना वाळूने भरलेले एक निळ्या रंगाचे स्वराज ट्रॅक्टर क्र. एम.एच.२० जीक्यू १६८० दिसून आले. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने तो वेगाने पळवून नेला. काही अंतरावर ट्रॅक्टर अडवल्यावर त्यात सुमारे सव्वा ब्रास वाळू असल्याचे आढळले.
     ट्रॅक्टर थांबवल्यानंतर काही वेळातच संशयित आरोपी योगेश गंजे, तेजस पाटील आणि हेमंत शिंदे हे स्विफ्ट डिझायर गाडीतून (क्र. एमएच ०३ बीई ५४३७) घटनास्थळी आले. त्यांनी पथकाशी वाद घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यानंतर संजय त्रिभुवन आणि योगेश गंजे यांनी मंडळ अधिकारी दिनेश येडे यांना गाडीवरून खाली ओढून मारहाण केली. संजय त्रिभुवन याने हातातील लोखंडी वस्तूने येडे यांच्या गालावर प्रहार केला, ज्यामुळे ते जखमी झाले. यानंतर आरोपींनी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आणि चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.
    या घटनेनंतर जखमी मंडळ अधिकारी व पथकाने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांत धाव घेतली. दिनेश येडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय त्रिभुवन रा. वाक, ता भडगाव, योगेश सुरेश गंजे, तेजस रवींद्र पाटील आणि हेमंत शिंदे (सर्व रा. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments