ad headr

Powered by Blogger.

समाजप्रबोधनाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा जागर.. गोविंद महाराजांच्या भारुडातून सामाजिक वास्तवावर घणाघाती प्रहार.

भडगाव  दि 8. प्रतिनिधी सुभाष ठाकरे..
महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने व स्व. बापुजी फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखालीदि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय, भडगाव येथे समाजप्रबोधनात्मक भारूडाचा कार्यक्रम अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला. लोकशाही, सामाजिक भान आणि जनजागृतीचा हा सोहळा ठरला.
प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज यांनी आपल्या भारूडातून भ्रष्टाचार, दांभिकता, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा तसेच राजकीय उदासीनतेवर परखड शब्दांत प्रहार केला. भारूडाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला प्रश्न विचारायला शिकवले आणि ‘लोकशाहीत मतदार केवळ मत देणारा नव्हे तर सत्तेचा राखणदार आहे’ हा ठळक संदेश दिला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि “बोलकी शांतता” अनुभवत श्रोते भारावून  गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने होते. त्यांच्या हस्ते   आमदार किशोर पाटील यांचे पुत्र व पाचोरा गटनेते सुमित पाटील, भडगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा प्रदीप मालचे,  उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील ट्रेन लाईव्हचे संपादक दिलीप पाटील तसेच  गोविंद महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना हेमंत अलोने म्हणाले,
“बहुतेक पत्रकार संघांच्या कार्यक्रमांत बोलणारे आणि ऐकणारे पत्रकारच असतात. मात्र भडगाव तालुका पत्रकार संघ दरवर्षी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून सामान्य नागरिकांना विचारप्रवण करतो. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक ऐकण्यासाठी एकत्र येतात, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे.”

भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्या देण्यापुरती भूमिका न ठेवता समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी सक्रिय हस्तक्षेप केल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. पत्रकारितेचा सामाजिक दायित्वाचा वसा जपत संघाने उभारलेला हा प्रबोधनाचा मंच उपस्थितांमध्ये दीर्घकाळ विचारांची ठिणगी पेटवणारा ठरला.
कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार संघ व भडगाव तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. समाजजागृतीच्या या उपक्रमामुळे भडगावमध्ये प्रबोधनाची चळवळ अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

No comments