ad headr

Powered by Blogger.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन .

जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी) : बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या २४ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., व संस्कृती मंत्रालय भारत सरकार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आहे.
 तसेच सुहान्स केमिकल्स प्रा. लि., दाल परिवार, वेगा केमिकल्स प्रा. लि. न्युबो टेक्नॉलॉजीस, चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य मिळणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी सहभागी होणाऱ्या कलावंत परीचय.

श्रुती बुजरबरुआ (गायन)

श्रुती बुजरबरुआ ह्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका तसेच पार्श्वगायिका आहेत. त्यांचा जन्म व पालनपोषण आसाममध्ये एका संगीतपरिवारात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी आपल्या पालकांकडून मुनींद्र बुजरबरुआह आणि सौ. संगीता बुजरबरुआह यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भातखंडे संगीत विद्यापीठ, लखनऊ येथून ‘संगीत विशारद’ व ‘संगीत अलंकार’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत. शुद्ध शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, मराठी अभंग, भजन, गझल इत्यादी उपशास्त्रीय संगीतप्रकारांमध्येही त्या आपल्या सुमधुर स्वरांची छटा उलगडतात. श्रुती या आसामी, इंग्रजी, हिंदी, बंगाली व मराठी भाषा बोलू शकतात. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. 
 चिराग कट्टी (सतार वादन)

चिराग कट्टी हे आजच्या काळातील भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान व आशादायी तरुण सतारवादक आहेत. आपले वडील व गुरु पं. शशांक कट्टी यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेल्या चिराग हे आकाशवाणीचे ‘अ’ दर्जाचे कलाकार आहेत. २०१७ व २०२४ या दोन्ही वर्षांत त्यांनी आकाशवाणीच्या प्रतिष्ठित ‘नॅशनल प्रोग्रॅम’मध्ये सादरीकरण केले आहे. ते ‘सुरमणी’ पुरस्काराचे मानकरी असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) पॅनेलवर निवडलेले कलाकार आहेत. तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून त्यांना सतार वादनासाठी शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.

No comments