ad headr

Powered by Blogger.

मुस्लिम कुटुंबीयांचा एक अनोखा हृदयस्पर्शी विवाह सोहळा भडगावात....


भडगाव:- दि. 29 [ प्रतिनिधी ].. सुभाष ठाकरे. जात, धर्म आणि रक्ताच्या पलीकडे जाऊन मानवी नात्यांचे अनमोल सौंदर्य जपणारा एक हृदयस्पर्शी विवाह सोहळा नुकताच भडगाव येथे पार पडला. डॉ. अशोक ओस्तवाल यांच्या कुटुंबाने संगोपन केलेला, त्यांचा माजी कंपाऊंडर आणि आता बीएसएफमध्ये कार्यरत असलेला चिरंजीव आसिफ याच्या विवाहप्रसंगी, त्याच्या नवीन कुटुंबीयांनी डॉ. ओस्तवाल यांच्या अहिंसा परमो धर्म: प्रेमी शाकाहारी जीवनशैलीचा आदर करत एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला.
आसिफ सईद शेख रा. टोणगाव हा अनेक वर्षांपासून डॉ. अशोक ओस्तवाल यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून कार्यरत होता आणि कुटुंबातील एक सदस्य बनला होता. ओस्तवाल कुटुंबाने त्याला प्रत्येक सुख-दुःखात, समारंभात स्वतःच्या मुलाप्रमाणे स्थान दिले. पाच वर्षांपूर्वी आसिफ बीएसएफमध्ये रुजू झाला सध्या तो राजस्थान येथे कार्यरत आहे. विवाहयोग्य वय झाल्यावर एरंडोल येथील वधूसोबत त्याचा निश्चित झाले. ओस्तवाल कुटुंबातील खोल ऋणानुबंधामुळे, त्यांनी आसिफच्या मुस्लिम विवाह सोहळ्यात, शुद्ध शाकाहारी जेवणाचा आग्रह धरला. वधू पक्षाच्या पालकांनीही तात्काळ हा आग्रह मान्य केला. हा विवाह दिनांक २५ नोहेंबर रोजी सपन्न झाला. 
​ सामाजिक सौहार्दाचे अनोखे उदाहरण
​सामान्यतः मुस्लिम विवाहसोहळ्यांमध्ये मांसाहारी मेजवानीची समृद्ध परंपरा असते. मात्र, ओस्तवाल कुटुंबाच्या भावनांचा आदर राखण्यासाठी, आयोजकांनी संपूर्ण विवाह भोजनाचा मेनू शाकाहारी ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. परंपरेत बदल करून सामाजिक सौहार्दाचे हे सुंदर उदाहरण घालून दिले. हा सन्मान पाहून डॉ. अशोक ओस्तवाल, सौ. सरोज, डॉ. प्रितेश, आर्किटेक प्रिया, डॉ. तृप्ती आणि त्रिशा ओस्तवाल यांच्यासह संपूर्ण परिवार कृतकृत्य झाला. डॉ. ओस्तवाल म्हणाले, "आम्ही या परिवाराचा भाग आहोतच, पण आमच्यासाठी संपूर्ण जेवण शाकाहारी ठेवणे हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय सन्मान आहे." त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळत होते.
​ मेनुमध्येही सांस्कृतिक समन्वय
​या अनोख्या सोहळ्यात केवळ शाकाहारच नव्हे, तर खाद्यपदार्थांमध्येही सांस्कृतिक समन्वय साधला गेला. मेनूमध्ये सुवासिक पुलाव, शाही पनीर, दाल तडका, भाजी-फुलका, मटार-कोबीच्या भाज्या यांसारख्या उत्तर भारतीय आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा समावेश होता, ज्यामुळे पाहुण्यांच्या जेवणाचा आनंद द्विगुणित झाला.
​या निर्णयाबद्दल उपस्थितांमध्येही कौतुकाची चर्चा होती. "परस्परांचा आदर आणि विचार करण्याची वृत्ती समाजात ऐक्य वाढवते, हा विवाह त्याचे उत्तम उदाहरण आहे," असे मत अनेकांनी व्यक्त केले.
​वराचे जन्मदाते पालक वेगळे असले तरी, बालपणापासून प्रेमाने संगोपन करणाऱ्या आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या डॉ. अशोक ओस्तवाल व त्यांच्या कुटुंबाला नववधू-वरांनी आनंदाने शुभाशीर्वाद दिले. या विवाहसोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, नातेसंबंध रक्तावर नव्हे, तर प्रेम, त्याग, संवेदनशीलता आणि परस्पर आदरावर टिकून राहतात.

No comments