भरतसिंग पाटील यांच्या ग्रंथांवर चिंतनचर्चा संपन्न. मसाप व मराठी विभागाचा अभिनव उपक्रम*
अमळनेर : दि. 24 [ प्रतिनिधी ]महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा - अमळनेर व मराठी विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथ : चिंतनचर्चा’ या उपक्रमांतर्गत एक विचारमंथनात्मक कार्यक्रम महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी सभागृहात सोमवार, २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात मराठीतील प्रसिद्ध समीक्षक डॉ. भरतसिंग पाटील लिखित 'जी.ए. : अज्ञेयाचे यात्रिक (आदिबंधात्मक शोध)' आणि 'पाण्यारण्य : तृष्णेची शोधयात्रा (आदिबंधात्मक अन्वयार्थ)' या दोन समीक्षा ग्रंथांवर चिंतनचर्चा आयोजित करण्यात आली. मराठीतील आदिबंधात्मक या समीक्षापद्धतीचे स्वरूप, वैशिष्ट्ये व उपयुक्ततेसंदर्भात विविध तपशील देऊन चर्चा झाली. यावेळी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
पहिल्या व्याख्यानात ‘जी. ए. : अज्ञेयाचे यात्रिक (आदिबंधात्मक शोध)’ या समीक्षा ग्रंथावर प्रा. नितीन पाटील यांनी चिंतनात्मक चर्चा केली. त्यांच्या मांडणीत जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यविश्वाचा शोधक दृष्टिकोन, लेखनातील तत्त्वचिंतन तसेच आदिबंधात्मक समीक्षेची वैशिष्ट्ये सखोलपणे उलगडून सांगितली. ग्रंथाच्या आशयगर्भतेवर आणि समीक्षात्मक मूल्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.
दुसऱ्या व्याख्यानात ‘पाण्यारण्य : तृष्णेची शोधयात्रा (आदिबंधात्मक अन्वयार्थ)’ या समीक्षा ग्रंथावर डॉ. रमेश माने यांनी सैद्धांतिक स्वरूपाची मूलभूत चर्चा केली. त्यांनी दिनकर मनवर यांच्या कवितेची विविध उदाहरणे देत त्यांच्या कवितेच्या विशेष नोंदविले. यावेळी कवी दिनकर मनवर यांच्या काही प्रातिनिधिक कविता डॉ. रमेश माने यांनी सादर केल्या. तसेच डॉ. भगतसिंग पाटील यांच्या समीक्षा लेखनाचे महत्व विशद केले. पुस्तकाचे लेखक, समीक्षक डॉ. भरतसिंग पाटील यांनी आदिबंधात्मक समीक्षा लेखनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मराठी समीक्षेची सद्य:स्थितीवरही त्यांनी भाष्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप बाबुराव घोरपडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भरतसिंग पाटील यांच्या समीक्षेची बलस्थाने अधोरेखित करून त्यांच्या समीक्षेची महत्व सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव तसेच समीक्षक डॉ. भरतसिंग पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा. डी. डी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. विजय तुंटे, सौ. सीमा भरतसिंग पाटील, डॉ. जतीन भरतसिंग पाटील व त्यांचा परिवार तसेच महाविद्यालयातील सर्व, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. अशोक पाटील, डॉ. योगेश तोरवणे, म.सा.प शाखा अमळनेरचे पदाधिकारी नरेंद्र निकुंभ, भारती सोनवणे, विजया गायकवाड, तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. तुषार पाटील, प्रा. गोपाल बडगुजर, डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व शहरातील साहित्यरसिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर मराठे यांनी केले.
Post a Comment