भडगाव नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उशिरा पर्यंत मतदाराच्या रागाचंरांगा.
भडगाव: [प्रतिनिधी सुभाष ठाकरे].. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील १२ प्रभागांतील २४ नगरसेवकांसाठी ४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया कीरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. विशेषतः महिला आणि पुरुषांच्या लांबच लांब रांगांनी मतदारांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास आणि उत्साह दर्शवला.
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा संथ असला तरी, दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढू लागला. रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा कायम होत्या. काही मतदान केंद्रांवर गर्दीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली, तर मतदारांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. मतदानाचा वेग धीमा असल्याने अंधारामुळे मतदारांना अडथळा येऊ नये म्हणून नगरपरिषदेने पुढाकार घेत मतदान केंद्रांवर तातडीने वीज पुरवठा सुरू केला.
वेळेनुसार मतदानाची टक्केवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत: ४.४८ %, सकाळी ११.३० वाजेपर्यंत: ८.९८ %, दुपारी १.३० वाजेपर्यंत: १७.८५ %, दुपारी ३.३० वाजेपर्यंत: ३३.३७ % सुरुवातीला मतदान धीम्या गतीने झाले असले तरी, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानाने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली. भडगावकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले आहे.
मतदार मतदानापासून वंचित निवडणूक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ मध्ये १४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवल्याने मतदान केंद्रावर गर्दीची स्थिती निर्माण झाली होती. मतदान केंद्रावर मतदार उपस्थित असतानाही निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांचे मतदान न घेतल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेमुळे मतदान केंद्रावर सुमारे दोन तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मतदार हजर असतानाही कर्मचाऱ्यांनी त्यांचे मतदान घेतले नाही आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याने तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी शीतल सोलट यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे तक्रार करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी शीतल सोलट यांनी तातडीने मतदान केंद्रांना भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली. मात्र, मतदान यंत्रे सील झाल्यामुळे वंचित मतदारांचे मतदान पुन्हा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे संकेतही सोलट यांनी यावेळी दिले. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याच्या या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment