ad headr

Powered by Blogger.

भडगाव शहराची सुरक्षा "ऐरणीवर"..लाखो रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठप्प;


भडगाव.[ प्रतिनिधी ].. सुभाष ठाकरे 
भडगाव शहरात काही महिन्यांपूर्वी  नगरपरिषद स्थानिक निधीतून तब्बल १५ ते १६ लाख रुपये तसेच खासदार निधीतून १० लाख रुपये असा एकूण २५ ते २६ लाखांचा खर्च करून शहराच्या सुरक्षेसाठी मुख्य चौकांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील कायदा-सुव्यवस्था, अवैध धंद्यांवर नियंत्रण, गुन्हेगारी रोखणे, 
महिला व विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण ही मुख्य उद्दिष्टे ठेवून ही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे लाखो रुपये खर्चून बसवलेले कॅमेरे धुळखात ठप्प पडले असून संपूर्ण निगराणी व्यवस्था अकार्यक्षम झाली आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा प्रत्यक्षात ‘रामभरोसे’ राहिल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे.
अवैध धंदे, गुन्हेगारी आणि चोरींमध्ये वाढ
सध्या भडगाव शहरात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती उघड होत आहे. याशिवाय शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून बस स्थानक परिसरात नागरिकांच्या व विशेषतः महिलांच्या मौल्यवान वस्तू चोरी जाण्याचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भडगावात येतात; महिलांचा रोजगार किंवा प्रवासासाठी शहरातील वर्दळीच्या ठिकाणांतून सतत ये-जा असते. अशा वेळी सीसीटीव्ही बंद असल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
४२ पैकी भडगाव शहरातील सैय्यद वाडा येथील केवळ एकच कॅमेरा सुरू असल्याची माहिती मिळते.
शहरातील एकूण ४२ कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतु बहुतेक सर्वच बंद पडले असून सुरक्षेचे जाळे पूर्णपणे निष्क्रिय झाले आहे.
महत्त्वाचे चौक ‘अंधारात’
भडगाव शहरातील खालील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
भडगाव बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक तहसील कार्यालय, नगरपरिषद चौक, डी.एड. कॉलेज बाळद रोड, विद्यानगर चौक, यशवंत नगर गणपती मंदिर, पेठ चौफुली, आदर्श कन्या विद्यालय कोठली रोड, इंग्लिश स्कूल चौक – पारोळा रोड,सौ. रजनीताई कॉलेज पाचोरा रोड या सर्व ठिकाणांवरील कॅमेरे सध्या बंद असून, निवडणूक काळात चौकाचौकात सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये जर कुठला अनर्थ घडला तर त्याचे पुरावे उपलब्ध न राहण्याची शक्यता अधिक आहे.

कॅमेरे जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात?
कॅमेरे बंद ठेवण्यामागे काही हितसंबंधी व्यक्तींचा हेतुपुरस्सर हस्तक्षेप तर नाही ना? असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित केला असून शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणूनच कॅमेरे बंद ठेवले जात आहेत का? असा संशयही व्यक्त केला जात आहे. यात नगरपरिषद प्रशासन आणि काही पोलिसांच्या गोपनीय विभागाचा आर्थिक लाभासाठी असलेला अनाकलनीय संबंध असल्याची चर्चा सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे.

नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष
शहरातील सुरक्षा व्यवस्था ठप्प झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, निवडणुका जवळ आल्याने तणावपूर्ण परिस्थितीत कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून संबंधित प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही व्यवस्था दुरुस्त करावे असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.

No comments