भडगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन.!!!
भडगाव [ प्रतिनिधी ] :- सुभाष ठाकरे
भडगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी भडगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळून अनेक प्रलंबित वाद तसेच वादपूर्व प्रकरणांचे यशस्वी निपटारा करण्यात आला.
या लोकअदालतीच्या पॅनल प्रमुखपदी दिवाणी न्यायाधीश सौ. पी. व्ही. राजळे तर पॅनल अॅडवोकेट म्हणून भडगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बी. आर. पाटील यांनी काम पाहिले.
या लोक अदालतीत न्यायालयीन पातळीवर प्रलंबित असलेली तसेच वादपूर्व अशी एकूण 69 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये कुटुंबीय वाद, बँक वसुली, विजबिल थकबाकी, वाहतूक अपघात भरपाई, नागरी तसेच फौजदारी प्रकारातील प्रकरणांचा समावेश होता. प्रकरणे सामोपचाराने सोडविण्यात येऊन एकूण ₹30,86,844/- इतक्या रकमेची तडजोड झाली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून वेळ, पैसा व ऊर्जा वाचली.
लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी भडगाव येथील सर्व मान्यवर वकील बांधव, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तहसील कार्यालय, नगरपालिका, ग्रामपंचायती व विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.
राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्व अधोरेखित करताना मान्यवरांनी सांगितले की, अशा लोकअदालतींमुळे समाजातील सामान्य नागरिकांना कमी खर्चात व अल्पावधीत न्याय मिळतो. वाद वाढण्याऐवजी ते संपुष्टात येऊन सामाजिक सलोखा व सौहार्द वृद्धिंगत होते.
सदर लोकअदालतीचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Post a Comment