जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ११ वर्षांखालील ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत लाखोंची बक्षिसे विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश
जळगाव येथे ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश ग्राऊंडमध्ये केले जाणार आहे. बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला असून देशभरातून ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, यातील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील अनुभूती या भव्य दिव्य मंडपात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत एकूण ११ फेऱ्या होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडेल या स्पर्धेत कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच श्री देवाशीष बरुआ हे मुख्यपंचांची भूमिका निभवतील तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य १४ पंच हे या स्पर्धेचे संचलन करतील. ही बुद्धीबळ स्पर्धा मुली व मुले अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे या स्पर्धेत प्रत्येक डावा साठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी ९० मिनिटे व प्रत्येक चाली साठी ३० सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे. सदरील स्पर्धा जरी ११ वर्षा आतील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता नवोदित खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळते. क्लासिकल प्रकारातील आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे हे बहुतांशी बुद्धिबळ खेळाडूंचे स्वप्न असते, कमी वयातच जर हे मानांकन प्राप्त झाले तर खेळाडूंना भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवणे तसेच बुद्धिबळातील स्पर्धात्मक वाटचाल सुकर होणे याबरोबरच बुद्धिबळ क्षेत्रात संधीची नवनवीन दालने पादाक्रांत करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, अशा विविध राज्यातील खेळाडूंशी आपला खेळ आजमावण्याची संधी यातून मिळेल तसेच या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधीसुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ७, ९ व ११ वर्षातील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे ५५० नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास ४०० खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल(२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू असून या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील तसेच चेसबेस द्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या ॲपद्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत.
या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी उपविजय व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड तर्फे दिले जाणार आहे प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहेतू पुरस्कृत करणारी भारतातील ही एकमेव बुद्धिबळ स्पर्धा असेल असे मत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष अतुल जैन यांनी याप्रसंगी मांडले.
सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे चेअरमन श्री अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी, जळगाव जिल्हा बुद्धिवान संघटनेचे सचिव नंदलाल गादीया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील सदस्य सर्वश्री चंद्रशेखर देशमुख, तेजस तायडे, पद्माकर करणकर, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, रवींद्र दशपुत्रे, डॉ. तुषार उपाध्ये व सल्लागार सदस्य आर. के. पाटील, विवेक दाणी, यशवंत देसले तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
Post a Comment